खिडकी

खिडकी
_सौ दया सुहास ढमढेरे.
सकाळी उठल्या उठल्या घराच्या खिडक्या उघडल्या आणि प्रसन्न गारवा घरात आला. त्या गारव्यासोबत माझं मन त्या खिडकीतच रुतून बसलं. मन विचार करू लागलं बाह्य जगाचा कवडसा असणारी ही, आपल्याला किती आनंद देत असते !!!...
     तिला रेलून उभ राहिल्यावर मन अलगद माहेराच्या खिडकीत गेलं 🥰🥰. कौलारू घराला असलेली गजांची आणि काचेच्या तावदानाची खिडकी डोळ्यापुढे लख्ख उभी राहिली. आताशा तिला देखील भक्कम ग्रील लागलं आहे म्हणा.... त्या खिडकीबरोबरच तिथल्या असंख्य स्मृतीही जाग्या झाल्या!!... विशेष करून आठवला, तो खिडकी लगत असलेला आरसा. त्याच्या जोडीने आठवलं , ते आजीचा दटावणं  😄😄  त्या आरशात पहात, वेणी घालायला लेट झाला की आजी दटावायची, "अशाने लग्नाचा मुहूर्त टळून जाईल !!!" पहा तर ही सासरची खिडकी कुठपर्यंत घेऊन गेली 😜😊
      बदलापुरातल्या सासरी दिसतात बहुसंख्या फ्लॅटच्याच खिडक्या. त्यांचा थाट काही औरच. पुढे अंगाबरोबर गॅलरी त्याला डेकोरेटिव्ह ग्रील. झालंच तर कोणी त्यात केलेलं हलकं लॉन...त्यावर टाकलेल्या एखाद दोन खुर्च्या. मग मागे मेन खिडकीचा दरवाजा. या प्रशस्त खिडक्यांवर असलेले पडदे पण तेवढेच रुबाबदार !!! कुठे अंगी वेलवेट लेऊनआलेले तर कुठे डोक्यावर झालंरीच तोरण असलेले, कुठे जाळीदार, कुठे नक्षी असलेले. तर कुठे कुठे डी_ मार्ट मधून आता घरात जागा मिळवलेले. बर या सोबतीला तिने मच्छर आणि कबुतरांसाठी अंगावर ल्यालेली जाळी वेगळीच!!!...
     यच्चायावत तरुणाई हिच्यावर फिदा.समोरच्या खिडकीत कोण आहे त्यावर हे लोक तिच्यातून डोकावणार. 😜😜😜  हीच्यातून रस्त्यावरून जाणाऱ्या मित्र-मैत्रिणींचे कानसे घेणे तर आलंच जोडीने.
     बच्चे कंपनीला तर ही हवीच हवी !!.. मग काऊ_ चिऊ पाहायचे असोत की रस्त्यावरून जाणाऱ्या , गाड्या या प्रकारात मोडणारे सगळे असो....शाळेत जाताना, खेळायला जाताना, क्लासला जाताना, हिच्यातून डोकावणे सुरूच असते.
     घरच्या समस्त महिला वर्गांना बाहेर गेलेले नवरोबा कधी येतात ते पाहायला आणि ते कुठे जात असताना त्यांना निरोप द्यायला ही हवीच.🤩🤩 कोणी खास पाहुणे यायचे असतील तर त्या दहा वेळेला जाऊन पाहतीलपाहुणे आले का?😂😂😂
     पुरुष वर्गाला तर ऐन थंडीतही खिडक्या उघड्या लागतात. पेपर वाचत खिडकीत बसायला आणि समवयस्कांना," तू हो पुढे मी येतो " किंवा," थांब रे "असे आवाज द्यायला हिच्या सारखी दुसरी सखी नाही...🤩🤩
     समस्त ज्येष्ठ नागरिकांना ही खिडकी म्हणजे विरंगुळ्याचे स्थान . गात्र थकली, बाहेर जाता येत नाही ,तरी तिच्यातून थोडीशी का होईना बाहेरची झलक दिसते त्यांना.
     आता हे सारं झालं वास्तूच्या खिडकी विषयी, पण प्रत्येकाच्या मनात एक खिडकी असते त्या खिडकीतून त्याने नितळ दृष्टिकोन ठेवून जगाकडे पाहायला शिकलं पाहिजे. सहअनुभूती सहवेदना यांची कवाड लेऊन मनाची खिडकी खुली ठेवली पाहिजे. आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं केलं पाहिजे.
_सौ दया सुहास ढमढेरे.

Write a comment ...

Daya Dhamdhere

Show your support

Writing kavita,stories for children and adults

Write a comment ...